गोष्ट लाडक्या आंब्याची

दारी विसावली थंडी
पावले रानात वळली
झाडे आमराईतली
पिवळ्या मोहरानं सजली
हो ... कोकणातल्या शेतकऱ्याला असंच काहीसं वाटतं. थंडीनंतर सुररु झालेली त्याची आमराईमधली धावपळ आता पार उन्हाळ्यानंतरच थांबणार असते. सगळं जग दरवर्षी न थकता न चुकता आंब्याची वाट पाहतं. आणि कोकणातून हा फळांचा राजा दिमाखात जगभर फिरण्यासाठी सज्ज असतो. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्याच्या कष्टाने जन्माला आलेलं सोनं म्हणजे आंबा. आंब्याचा हा प्रवास खूप शतकं अखंड चालत आलेला आहे. आंब्याला स्वतःचा इतिहास आहे.
पहिला आंबा हिमालयाच्या कुशीत सापडला. ई.स.पू. २५०० च्या आसपास तिथल्या जंगलांमधून लोकांनी आंब्याला आपल्या अंगणात आणलं. तिथून आंब्याचा नवा इतिहास सुरु झाला. प्राचीनकाळात आम्रफल म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंब्याचा उल्लेख बृहदारण्यक उपनिषदामध्ये आढळून येतो. बौद्ध साहित्यातून आणि जैनसाहित्यातून आंब्याचं धार्मिक महत्त्व आपल्याला समजू शकतं. गौतमबुद्धांनी आंब्याच्या झाडाखाली साधना केली होती असा संदर्भ सापडतो. तेव्हाचे राजे आणि सम्राट समृद्धीचं प्रतीक म्हणून राजकीय संबंध जपण्यासाठी आंब्याची देवाणघेवाण करत असत. मौर्य साम्राज्यात तर रस्त्यांच्या लगत आंब्यांची झाडं लावली होती. सम्राट अशोकाच्या काळातील तसे शिलालेखही सापडतात. त्यातून मौर्य साम्राज्य श्रीमंत आणि समृद्ध आहे असा संदेश सगळीकडे पोहोचला. तेव्हापासूनच आंब्याची परदेशवारी सुरु झाली. आधी चीन, मग मध्यपूर्व देश आणि मग युरोप.. आंबा वाट मिळेल तिथे जाऊन पोहोचला. पण आपलं जन्मगाव मात्र सोडलं नाही. आजही आंबा अनेक ठिकाणी पिकत असला तरीही महाराष्ट्रातल्या आंब्याची सर दुसऱ्या कशालाच नाही.
तर, प्राचीनकाळापासून सुरु झालेली आंब्याची वाटचाल मध्ययुगात मुघलांपर्यंत येऊन थांबली. बाबरला भारतामध्ये स्वतःची सत्ता स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आंबा मुघलांच्या कायम मर्जीत राहिला. मुघलांचं आंबाप्रेम पिढीजात राहिलं , तेही अगदी शेवटच्या मुघलसम्राटापर्यंत. अकबराने स्वतःसाठी आंब्याच्या बागा तयार केल्या होत्या. शाहजहानपण आंब्याच्या प्रेमात होता. कठीणभाग म्हणजे शाहजहानने स्वतःच्याच मुलाला औरंगजेबाला कैदेत ठेवलं, कारण काय तर औरंगजेबाने सगळे आंबे स्वतःसाठी ठेवले.मुघलांचे खानसामे ह्या प्रेमामध्ये कायमच भर घालत राहिले. त्यांच्या स्वयंपाकघरातून आंब्यांचे अनेक चवदार पदार्थ जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी तयार होऊ लागले. असा हा आंबा मिर्झा गालिब आणि बहादूरशाह म्हणजे शेवटचा मुघलसम्राट, यांच्या मैत्रीलासुद्धा कारणीभूत ठरला.
ह्याच दरम्यान मराठ्यांच्या राज्यातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने आजूबाजूला आंबा वगैरे उपयुक्त झाडे लावण्याचे आदेश दिले होते. नंतर पेशव्यांनी सुद्धा आमराया तयार केल्या. आपल्याचं मातीत आंबा आनंदाने बहरू लागला. पेशव्यांच्या बागेतही कलमे तयार करण्याचे प्रयोग झाले.
Chhatrapati Shivaji Maharaj | Image credit : Wikipedia commons
आणि मग आले ब्रिटिश, फ्रेंच आणि पोर्तुगीज...
आंब्याच्या प्रेमाला हे परकीय लोकसुद्धा अपवाद ठरले नाहीत. मल्याळममध्ये 'मांगा ' आणि तामिळमध्ये 'मामकाय' किंवा 'मामफलम ' असं म्हणवून घेणारा आंबा पोर्तुगीजांनी 'मँगो' म्हणून जगभर प्रसिद्ध केला. इथे आंब्याची एक छोटी अडचण होती. देशभर चोखून खाल्ला जाणारा आंबा ह्या युरोपियन लोकांच्या टेबलवर वाढता येणार नव्हता. पण आंब्याच्या चवीने ह्यांना गप्प बसू दिलं नाही.
आंब्याच्या कलमाचे पुष्कळ प्रयोग झाले. या सगळ्या प्रयोगांतून जन्माला आला ‘हापूस’ आंबा. भारतात पोर्तुगीज वसाहती स्थापन करण्यात ज्याने मोठे योगदान दिले तो पोर्तुगीज गव्हर्नर जनरल आणि समुद्री योद्धा अफोन्सो द अल्बुक्वेरकु (Afonso de Albuquerque) याच्या नावावरून सध्याच्या हापूस आंब्याला नाव मिळाले आहे. हा अफोन्सो समुद्र प्रवासात जिथे जाईल तिथून रोपे मिळवून कलमे तयार करायचा. उच्चारांतील फरकामुळे ब्रिटीश काळात ‘अफोन्सो’चे ‘अल्फोन्सो’ झाले.
Afonso de Albuquerque | Image credit : Wikipedia commons
तसा सुरवातीला आंबा ब्रिटिशांना आपल्या प्रेमात ओढण्यासाठी थोडा अयशस्वीच ठरला पण हे अपयश फार काळ टिकलं नाही. राणीच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये १९५३ साली आंब्याने दिमाखात हजेरी लावली. आजही रत्नागिरीमध्ये तयार होणारा हापूस असंख्य मनांवर निर्विवाद राज्य करतोय. प्रत्येक आंबाप्रेमीच्या स्वप्नात स्वतःचं राज्य निर्माण केलेला हापूस अशा प्रकारे जगभर पोचला.
बरं, नुसतीच अवीट गोडी असणारे हे फळ नाही. तर यात लोह, जीवनसत्वे आणि कॅलशिअमही असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. भारतीय संस्कृतीत आम्रवृक्षाचे धार्मिक महत्त्वही आहेच. घराला तोरण आणि कलशात आंब्याचीच पाने लागतात.
तर असा आहे आंब्याचा इतिहास. फळांचा राजा आणि राजाश्रय मिळालेलं फळ...असं वाटतं की आंबा हा फक्त फळांचा राजा नाही...तर एक गोष्ट आहे... पिढ्यान पिढ्या चालत आलेली... राजांपासून ते सामान्यजनांपर्यंत...आजी-आजोबांपासून नातवंडापर्यंत सगळ्यांना एका धाग्यात बांधणारी एक गोड रसाळ न संपणारी गोष्ट...
इथून पुढे कधीही आंबा..विशेषत: हापूस आंबा खाण्यापूर्वी त्याचा हा राजेशाही रुबाब आणि थाट नक्की आठवेल हो ना...ज्याने शतकानुशतके खवय्यांच्या मनावर आणि जीभेवर राज्य केले...मग बघा... स्वतःलाही ‘रॉयल फील’ आल्यावाचून राहणार नाही.
काय म्हणता? असा खात्रीने उत्तम गुणवत्तेचा, मधुर चवीचा, नैसर्गिकरीत्या पिकवलेला अस्सल रत्नागिरी हापूस आंबा कुठे मिळेल? अर्थातच Mangoes4U वर ... एकदा ऑर्डर करूनच मगच खात्री करा...
तसेच आपण भविष्यात असेच मनोरंजक लेख वाचू इच्छित असाल किंवा भविष्यकाळात Mangoes4U कडून खास सवलत ऑफर प्राप्त करू इच्छित असाल तर तळाशी असलेल्या आमच्या विनामूल्य वृत्तपत्रिकाला (newsletter) सब्स्क्रिब करा.
संदर्भ: